प्रशिक्षित व्यावसायिकांतून दौंडचा विकास शक्य | ARJ Sir, Daund
व्यावसायिकांसाठी छोटीशी पण मोलाची टिप – व्यावसायिक शिस्त, ग्राहक सेवा आणि स्थानिक विकास
लेखक – डॉ. अभिषेक राजेश जाधव (दौंड शहर व तालुका विकास विचार मंचाच्या वतीने)
आपण सध्या व्यवसायात असाल, दुकान चालवत असाल, सेवा देत असाल किंवा काही वस्तू विकत असाल — एक गोष्ट निश्चित आहे की, आपल्या प्रत्येक कृतीचा थेट परिणाम आपल्या शहराच्या, आपल्या तालुक्याच्या अर्थव्यवस्थेवर होतो.
हो, अगदी खरं! आपण जरी एक छोटा व्यवसाय चालवत असलो तरीही आपण दौंडच्या विकासात मोठं योगदान देत आहोत किंवा देऊ शकतो — हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे.
आपल्याकडून सुरु होणारा बदल
बऱ्याच वेळा असं होतं की ग्राहकाने काही काम दिलं आणि आपण "हो" म्हणतो. पण दुसऱ्याच क्षणी एखाद्या दुसऱ्या कामात, फोन कॉलमध्ये, किंवा गर्दीत ते विसरून जातो.
परिणाम?
- काम पूर्ण होत नाही.
- ग्राहक नाराज होतो.
- तो पुढच्या वेळी दुसऱ्या कोणाकडे जातो.
- आपल्याकडचा व्यवहार थांबतो.
पण ही साखळी इथेच थांबत नाही!
या एका व्यवहाराच्या अभावामुळे आपल्या व्यवसायाचं उत्पन्न घटतं, त्यामुळे आपण कमी लोकांना काम देतो, कमी खरेदी करतो, आणि याचा परिणाम पुढे दौंडच्या एकूण आर्थिक उलाढालीवर होतो.
यालाच microeconomics मध्ये "local economic chain reaction" असं म्हणतात.
प्रत्येक व्यवहार हा अनेक लोकांच्या पोटावर, संधीवर, रोजीरोटीसाठी महत्त्वाचा असतो.
सोप्पा उपाय – पण परिणामकारक
जर आपण प्रत्येक ग्राहकाचं काम, छोटीशी विनंती, काही वेळ थांबून डायरीत किंवा फोनमध्ये नोंदवून ठेवलं, तर...
- आपण काहीच विसरणार नाही.
- ग्राहक समाधानी राहील.
- व्यवसाय वाढेल.
- अधिक काम मिळेल.
- आपण दुसऱ्यांना रोजगार देऊ शकू.
- आणि हाच व्यवसाय दौंडच्या आर्थिक विकासाचं चक्र चालवेल.
ग्राहकांशी संवाद – तुमचा ब्रँड
कधी कधी आपण ग्राहकाला सांगतो:
“अहो, खूप काम आहे”,
“माणूस नाहीये अजिबात”,
“मी एकटाच सांभाळतो...”
ही कारणं खरी असली तरीही ग्राहकासाठी निराशाजनक असतात. त्याला त्याच्या समस्येचं उत्तर हवं असतं, तुमच्या समस्यांचं नाही.
जेंव्हा आपण ग्राहकाचं म्हणणं शांतपणे ऐकतो, त्याला उत्तर देतो, वेळेत सेवा देतो – तेंव्हा आपला व्यवसाय म्हणजे एक विश्वासार्ह ब्रँड बनतो.
दौंडचा विकास – अर्थशास्त्राच्या सोप्या भाषेत
दौंडसारख्या तालुक्याच्या आर्थिक वृद्धीसाठी तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात:
-
स्थानिक सेवा/व्यवसायांची गुणवत्ता:
जर ग्राहकांना आपल्या गावात/शहरात चांगली सेवा मिळाली, तर ते बाहेरच्या ठिकाणी पैसे खर्च करणार नाहीत. पैसा स्थानिक बाजारातच फिरतो, आणि हाच पैसा इतर व्यावसायिकांपर्यंत पोहोचतो. -
रोजगार निर्मिती:
व्यवसाय वाढल्यास आपण नवीन लोकांना काम देतो. रोजगार निर्माण होतो, बेरोजगारी कमी होते.
यामुळे कौटुंबिक उत्पन्न वाढतं, खरेदी वाढते, आणि संपूर्ण समाज समृद्ध होतो. -
कर भरणे आणि नागरी विकास:
व्यवसायात वाढ झाली की लोक कर भरतात (GST, स्थानिक कर), जे नगरपालिका/पंचायतीकडे जातात. याच पैशातून रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य सुविधा तयार होतात.
शेवटी – आपल्याकडून सुरुवात!
दौंडचा विकास फक्त राजकीय वायदे, सरकारी योजना, किंवा मोठ्या गुंतवणुकीने होणार नाही.
दौंडचा खरा विकास होईल तो, जेव्हा इथले प्रत्येक व्यावसायिक व्यावसायिक शिस्त, पारदर्शक व्यवहार, वेळेचे नियोजन आणि ग्राहक सेवेवर भर देईल.
प्रशिक्षण घ्या, डिजिटल साधनांचा वापर करा, नोंदी ठेवा, संवाद सुधारा.
दौंड फक्त पुण्याजवळचं एक स्टेशन न राहता – एक विश्वासार्ह आर्थिक केंद्र होऊ शकतो.
(दौंड शहर व तालुका विकास विचार मंचाच्या वतीने – डॉ. अभिषेक राजेश जाधव)
Comments
Post a Comment